अजितदादांचा घातपात झाला; रोहित पवार यांचा आरोप

बारामती : अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले.

दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारेल, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, आज अजित दादा आपल्यात नाही. आम्ही प्रयत्न करून आम्हाला ही सर्व माहिती मिळाली आहे. मग सरकारच्या एजन्सीने जर काम केलं, तर या अपघाताचे रहस्य लवकरात लवकर आपल्याला कळेल, असे म्हणत रोहित पवार यांनी अजितदादांचा घातपात झाल्याचा आरोप केला. तसेच VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त केला.

लोकांना सत्य कळावे, म्हणून पत्रकार परिषद

रोहित पवार यांनी अफवांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना एक प्रसंग सांगितला. पिंपरी चिंचवडमध्ये सिग्नलला थांबले असताना एका रिक्षाचालकाने त्यांना विचारले की, 9 तारखेला तुम्ही अजितदादांबाबत काही सांगणार होता, त्याचं काय झालं? त्यावर रोहित पवार यांनी त्याला 10 तारखेला सर्व सांगणार असल्याचे उत्तर दिले. काही लोकांनी भावनिक होऊन दादा परत येतील असे व्हिडिओ टाकले, काहींनी विमानात सहा जण होते आणि दादांचे पार्थिव सापडले नाही असे सांगितले. या सर्व चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळेच लोकांना सत्य कळावे, म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.


दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत

या प्रसंगी रोहित पवार अत्यंत भावुक झाले. त्यांनी सांगितले की अपघातानंतर सलग सहा दिवस त्यांना हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटत होते. दादांचा अपघात झालाच नाही असे त्यांना सतत वाटत होते. मात्र, जेव्हा त्यांनी अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या, तेव्हा वास्तव समोर आले. जळालेला स्वेटर, चप्पल आणि अजितदादांच्या हातातील घड्याळ त्यांनी पाहिले. दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत असत. त्या घड्याळात 9 वाजलेले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून त्यांना खात्री पटली की अजितदादा आता हयात नाहीत.

लोकांना नेमके काय घडले हे कळले पाहिजे

रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादांच्या प्रेमापोटी त्यांनी या अपघाताबाबत शक्य ती माहिती गोळा केली. काही जण विचारतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली, परंतु दादांबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळेच हा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत नसतानाही जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. दादा आणि साहेबांनी नेहमी एकच सांगितले, प्रयत्न करत राहा. त्याच विचारातून हा संपूर्ण तपशील समोर आणण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना नेमके काय घडले हे कळले पाहिजे, हीच भूमिका त्यांनी मांडली.
 

संबंधित लेख