शृंगारतळी शाखेतर्फे सहकार सप्ताहानिमित्त आर्थिक सक्षमीकरण मोहीम
- by Yogesh Bandagale
- December 02, 2025
- 42 views
शृंगारतळी : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था (शृंगारतळी शाखा, जि. रत्नागिरी) यांच्यावतीने सहकार सप्ताहानिमित्त २२ नोव्हेंबर २०२५ रोजी शृंगारतळी, पालशेत, कुडली आणि गुहागर मच्छिमार्केट परिसरात व्यापक आर्थिक सक्षमीकरण संपर्क मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान शाखा व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी स्थानिक व्यावसायिक, नागरिक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या घटकांशी संवाद साधत संस्थेच्या योजनांची माहिती दिली. सभासद वाढ मोहीम, पिग्मी दैनिक बचत योजना, तसेच सोने तारण, मालमत्ता तारण आणि विनातारण कर्ज योजना याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देऊन त्यांना सहकार माध्यमातून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
याशिवाय, NEFT/RTGS सारख्या आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांची ओळख करून देत सुरक्षित व जलद व्यवहारांचे महत्त्व समजावण्यात आले. विशेषतः, महिला बचत गटांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांना आर्थिक नियोजन, कर्जप्रक्रिया, बचतीचे महत्त्व आणि उद्योजकतेसाठी उपलब्ध सहाय्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश ग्रामीण आणि किनारी भागातील नागरिकांना सहकार चळवळीत सामील करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे हा होता. शृंगारतळी शाखेची ही मोहीम उत्साहात पार पडली असून स्थानिक पातळीवर तिचे स्वागतही झाले आहे.
