शाखा पालशेततर्फे सहकार सप्ताहानिमित्त बुधल ग्रामस्थांना मार्गदर्शन

गुहागर (बुधल) : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जिल्हा रत्नागिरी – शाखा पालशेत यांच्या वतीने सहकार सप्ताहानिमित्त बुधल गावात विविध सामाजिक आणि आर्थिक जागरूकता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत बुधल गावातील बचत गट महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. महिलांना ठेवी, बचत योजनांचे महत्त्व, विविध कर्ज योजना, त्यांचे व्याजदर तसेच NEFT-RTGS सारख्या आधुनिक बँकिंग व्यवहारांची माहिती देण्यात आली. शाखाधिकारी श्री. गणेश ढोर्लेकर यांनी पतसंस्थेच्या सर्व महत्वाच्या योजना समजावून सांगत महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान १७ आवर्ती ठेवीची नवीन खाती आणि ४ बचत खाती उघडण्यात संस्थेला यश मिळाले, ही या उपक्रमाची उल्लेखनीय बाब ठरली.

समन्वय समिती सदस्य मा. श्री. प्रकाश गणपत नाटेकर यांनी आपल्या अनुभवानुसार महिलांना व्यवहार नियोजन, वित्तीय शिस्त, कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यवहारातून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या माहितीपूर्ण संवादाचे सर्वांनी कौतुक केले.

या उपक्रमाला बुधल गावचे पाटील कारभारी मा. श्री. सखाराम देवजी पाटील, श्री. संदीप यशवंत पाटील, समन्वय समिती सदस्य श्री. प्रकाश नाटेकर, शाखाधिकारी श्री. गणेश ढोर्लेकर, कर्मचारी श्री. अविनाश म्हातनाक यांची उपस्थिती लाभली. बचत गट महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

शाखा पालशेतने राबविलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, बुधल गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संस्थेच्या सहकारभावनेला बळ देणारा ठरला आहे.

संबंधित लेख