लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य: उमेश सकपाळ

चिपळूण : चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभला असून, यंदा चिपळूण नगर परिषदेचाही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. नगर पालिकेच्या जागेत कार्यरत असलेल्या या वाचनालयाने आजवर चिपळूणच्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भर घातली आहे. नगराध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाला आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, तसेच वाचनसंस्कृती अधिक जोमाने रुजावी, पालिका आणि वाचनालय यांनी यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी भावना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केली.

सोमवारी सायंकाळी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी वाचनालयाची स्थापना, त्याचा प्रदीर्घ इतिहास व सामाजिक योगदान याविषयी माहिती दिली. पहिले नगराध्यक्ष रंगूनाना पत्की यांनी वाचनालयासाठी पाचव्या जागा दिल्यानंतर वाचनालयाची जुनी इमारत उभी राहिली आणि हळूहळू वाचनालयाची प्रगती होत गेल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात ग्रंथालयांना अनुदान कमी मिळत असून तेही वेळेवर न मिळाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. वाचनालयातील चित्रदालन व वस्तू संग्रहालय आपण यापूर्वी पाहिले असून, पुन्हा एकदा सविस्तर पाहणी व चर्चा करण्यासाठी नक्की भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कार्याध्यक्ष अरुण इंगवले, अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, सुबोध दीक्षित, विनायक ओक, संजय शिंदे, राष्ट्रपाल सावंत, श्रीराम दांडेकर, सुधीर पोटे, सौ. माधुरी पोटे, अनिल धोंडे, मानसी पटवर्धन, सौ. स्वरदा कुलकर्णी, आराध्या यादव, सौ. गौरी भोसले, संदीप जाधव, दीक्षा जाधव, सुजाता गुढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख