प्रसाद सावंत यांची रत्नागिरी जिल्हा युवासेना प्रमुखपदी नियुक्ती

रत्नागिरी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा (रत्नागिरी, राजापूर-लांजा आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) यासाठी जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीत प्रामाणिक आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून परिचित असलेल्या प्रसाद सावंत यांनी आधी युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. संघटनेच्या सुरुवातीच्या फळीत ते सक्रिय होते तर संघटनेच्या पडत्या काळातही त्यांनी दोन वेळा तालुका अधिकारी पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली आहे.

सध्या प्रसाद सावंत रत्नागिरी शहर संघटक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळी संघटनेने त्यांच्यावर जिल्हा युवा अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. प्रसाद सावंत यांनी या नियुक्तीबाबत सांगितले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेने दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडेन. संघटनेच्या धोरणांची अंमलबजावणी करून स्थानिक तरुण कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”

युवासेनाचे वरिष्ठ नेते प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे चालवू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून आगामी निवडणुकीत संघटनेची भूमिका मजबूत करणे हा देखील उद्देश ठेवल्याचे सांगितले.

संबंधित लेख