दिल्लीतील लाल किल्ल्यावर महाराष्ट्राच्या महिलांनी सादर केले पारंपरिक लेझीम नृत्य
- by Yogesh Bandagale
- December 18, 2025
- 130 views
मुंबई : दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर नुकत्याच पार पडलेल्या युनेस्को परिषदेअंतर्गत सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आंतरसरकारी समितीच्या २० व्या अधिवेशनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील नऊ महिला कलाकारांनी पारंपरिक लेझीम नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री मा. श्री. गजेंद्र सिंह शेखावत तसेच कार्यक्रमाचे समन्वयक श्री. महेंद्र कुमार सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी १७५ देशांतील युनेस्कोचे सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोककलेविषयी त्यांनी विशेष कुतूहल व्यक्त करत कलाकारांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
भारतीय संस्कृती आणि लोककला जतन व संवर्धनाच्या दृष्टीने महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करत, भविष्यात २६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचे मंत्रीमहोदयांनी यावेळी सांगितले.
देशातच नव्हे तर परदेशातही महाराष्ट्राची लोककला पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे शिवकालीन तुतारी लोककला मंडळ, कांदिवली (पश्चिम), मुंबईचे संस्थापक अध्यक्ष श्री. पांडुरंग शंकर गुरव यांच्या प्रयत्नांमुळे या लेझीम पथकाला लाल किल्ल्यावर आपली कला सादर करण्याची मानाची संधी मिळाली.
या सादरीकरणामुळे महाराष्ट्राची लोकसंस्कृती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली असून, भारतीय लोककलेच्या समृद्ध परंपरेचा गौरव वाढला आहे.
