चिपळूण नगर पालिका निवडणुकीत तब्बल १५४ उमेदवारी अर्ज दाखल
- by Yogesh Bandagale
- November 17, 2025
- 83 views
चिपळूण: चिपळूण नगर पालिका निवडणुकीत आज, सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आजपर्यंत एकूण १५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १३ उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले आहेत.
महाविकास आघाडी होणार की महायुती, याबाबतचे राजकीय वातावरण अद्यापही धूसरच आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजू देवळेकर, शरद पवार गट राष्ट्रवादीचे रमेश कदम, तसेच काँग्रेसचे लियाकत शहा यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत.
अंतिम दिवशी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून मिलिंद कापडी यांनी, तर शिवसेना (शिंदे गट) कडून शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी कोणताही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही, यामुळे भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तथापि अजित पवार गट (राष्ट्रवादी) कोणत्या बाजूला झुकणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया संपल्यानंतर आता छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यांनंतरच अंतिम लढत कोणकोणामध्ये रंगणार हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक समीकरणे अधिकच रंजक होत असून, चिपळूणमधील राजकारणाला चांगलाच ताप चढला आहे.
