चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार युनायटेडच्या स्वरांगी जोशी हिला जाहीर

 चिपळूण  :  'चतुरंग प्रतिष्ठान' तर्फे दिला जाणारा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार यावर्षी युनायटेड इंग्लिश स्कूलमधील दहावीची विद्यार्थिनी कु. स्वरांगी प्रमोद जोशी हिला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराचे हे २५ वे वर्ष आहे. गेली अनेक वर्ष हा उपक्रम सातत्याने चालू आहे. 
या पुरस्कारासाठी दि. १३-१४ डिसेंबर रोजी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांचे ग्रुप इंटरव्ह्यू पार पडले. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांमधील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 
युनायटेड इंग्लिश स्कूलच्या स्वरांगी जोशी हिने आत्तापर्यंत वक्तृत्व, कथाकथन स्पर्धेत राज्यस्तरावर मिळवलेली अनेक पारितोषिके, चित्रकलेच्या दोन्ही परीक्षांमधील सर्वोत्तम गुणांकन, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीतील स्थान, विज्ञान,गणितच्या स्पर्धा परीक्षेतील नैपुण्य, कालिदास विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षेत राज्यस्तरावरील रँक, अभ्यासाबरोबर विविध कलागुणांतील तिचे यश आणि प्रत्यक्ष मुलाखत यातून स्वरांगीची या पुरस्कारासाठी निवड झाली. रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणाऱ्या सोहळ्यामध्ये स्वरांगीला हा पुरस्कार दिला जाणार आहे. 
या पुरस्काराबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ.रेवती कारदगे, तिच्या वर्गशिक्षिका सौ. वैशाली चितळे, शाळेमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वरांगीचे अभिनंदन आणि कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चिपळूणमधील अनेकांनी तिला फोन, मेसेज करून, घरी येऊन तिचे अभिनंदन केले.

संबंधित लेख