कोकणाच्या मुळावर उठणारा प्रकल्प होऊ देणार नाही : उद्योगमंत्री उदय सामंत

चिपळूण | प्रतिनिधी

लोटे एमआयडीसीमध्ये उभारणीच्या मार्गावर असलेल्या व इटलीत बंदी असलेल्या बहुचर्चित प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
कोकणाच्या मुळावर उठणारा कोणताही प्रकल्प कधीही होऊ देणार नाही. जनतेने घाबरून जाऊ नये. अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती फिरत असून प्रत्यक्षात संबंधित कंपनीत नियमित उत्पादन सुरू नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस दिली असून, त्या नोटीसीचा अधिकृत खुलासा झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
इटलीत बंदी असलेली कंपनी भारतात कशी आली, यासाठी केंद्र सरकारची परवानगी आहे का, याची माहिती घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

फ्लोरिन निर्मितीच्या केवळ एका चाचणी बॅचची निर्मिती करण्यात आली असून ती सुरक्षितरीत्या तळोजा येथे डिस्पोज करण्यात आली आहे. कोकणाच्या पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि जनतेच्या आरोग्याला धोका ठरणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला शासनाचा पाठिंबा मिळणार नाही, असा पुनरुच्चारही उद्योगमंत्री सामंत यांनी केला.

संबंधित लेख