‘हिंद-दी-चादर’ शहीदी वर्षानिमित्त ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घ्या
- by Yogesh Bandagale
- February 13, 2026
- 40 views
रत्नागिरी, दि. १२ (जिमाका) : ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करून समागमाबाबत व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या.
श्रीमती रानडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील उपस्थित होते. दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी प्रसिद्धीसाठी ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचा नियमित आढावा घेऊन शिक्षण विभागाला दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच श्री सतीदर सरताज यांचे ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीत ग्रामपंचायतींतील लाऊडस्पीकरवर प्रसारित करावे. समागमाच्या प्रचारासाठी बॅनर गावांच्या प्रवेशद्वारांवर तसेच प्रमुख ठिकाणी लावावेत, असेही निर्देश देण्यात आले.
सर्व ग्रामपंचायतींमध्ये दररोज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची निवड करून त्यांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात येणार आहे.
शहीदी समागम निमित्त २५ फेब्रुवारीपर्यंत ‘आरोग्य पंधरवडा’ राबविण्यात येणार असून गावागावांत, वस्ती-वस्तीमध्ये विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शिबिरांच्या दर्शनी भागात समागमाचे प्रचार-बॅनर लावावेत. सर्व आरोग्य केंद्रे व रुग्णालयांना लक्ष्यांक निश्चित करून कार्यवाही करावी. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात येणार असल्याचेही श्रीमती रानडे यांनी स्पष्ट केले.
‘हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक शहीदी वर्षानिमित्त ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत जनजागृतीचे व्यापक वातावरण निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
