हर्षिणी चव्हाण हिने देशपातळीवर उंचावला महाराष्ट्राचा झेंडा
- by Yogesh Bandagale
- January 12, 2026
- 34 views
मार्गताम्हाणे (चिपळूण) : अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग लीग अजिंक्यपद स्पर्धेत कोकणच्या लेकीने सुवर्णकामगिरी करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. उत्तर प्रदेशातील मोदीनगर (गाझियाबाद) येथे ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत कु. हर्षिणी जागृती प्रशांत चव्हाण हिने युथ (१७ वर्षांखालील) ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.
हर्षिणीने स्नॅच प्रकारात ६२ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात ८० किलो असे एकूण १४२ किलो वजन यशस्वीरीत्या उचलून प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या घवघवीत यशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा भारताची नामवंत वेटलिफ्टर, पद्मश्री पुरस्कार विजेती मिराबाई चानू यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यांच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारताना हर्षिणीचा आत्मविश्वास आणि कष्टाचे फळ स्पष्टपणे दिसून आले.
हर्षिणीच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक श्री. सुनील दळवी (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) आणि श्री. समीर सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळेच हर्षिणी आज राष्ट्रीय स्तरावर चमकू शकली, असे क्रीडाप्रेमींनी नमूद केले.
हर्षिणी चव्हाण हिच्या या सुवर्णयशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील क्रीडावाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
