ह.भ.प. चारूदत्तबुवा आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’
- by Yogesh Bandagale
- January 09, 2026
- 60 views
चिपळूण (प्रतिनिधी) : आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या सुयोग्य व नेटक्या संयोजनामुळे चिपळूणकर रसिकांना दरवर्षी ज्या कीर्तनमालेची ओढ लागते, ती बहुप्रतीक्षित कीर्तनमाला यंदा दशकपूर्ती वर्षात १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदाच्या विशेष कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे हे ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ हा अभ्यासपूर्ण व ऐतिहासिक विषय रसिकांसमोर उलगडणार आहेत.
दि. १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही कीर्तनमाला सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे ही कीर्तनमाला रसिकांसाठी विनामूल्य असून, प्रेक्षागृहातील पहिल्या काही आसन रांगा निमंत्रित व आयोजक परिवारासाठी राखीव असणार आहेत.
कीर्तनमालेचे उद्घाटन सोमवार, १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक व प्रवचनकार श्री. धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
ह.भ.प. चारूदत्तबुवा आफळे यांच्या अमोघ वाणीस सुश्राव्य संगीताची नेहमीच प्रभावी साथ लाभते. यावर्षी सहकारी कलावंत म्हणून तबला – मिलिंद तायवाडे, पखवाज – मनोज भांडवलकर व ऑर्गन – चिंतामणी निमकर हे साथसंगत करणार आहेत. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप वातावरणनिर्मिती व विनामूल्य प्रवेश यामुळे ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे रसिकांच्या स्मरणात कोरली गेली आहे.
चिपळूण बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्री गुरुमाऊली सद्गुरू वासुदेव दळवीकाका महाराज यांच्या आशीर्वादाने ही कीर्तनमाला संपन्न होत असून, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतीय संस्कृतीचे विविध पैलू चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून उलगडतात.
मराठेशाहीच्या इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या या कीर्तनमालेत रसिकांना ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ अनुभवता येणार आहे. पानिपतची लढाई कशी झाली, त्यातून आपण काय मिळवले व काय गमावले, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची अल्पकालीन पण दैदिप्यमान कारकीर्द, तसेच आनंदीबाई पेशव्यांचा खरा इतिहास यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या कीर्तनमालेतून उलगडणार आहेत.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील जागेची मर्यादा लक्षात घेता, रसिकांनी विनामूल्य प्रवेशाच्या आसनव्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
