स्वधर्मपालनातूनच भगवंतांची भेट – ह.भ.प. आफळेबुवा
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 30 views
चिपळूण, दि. १३ : परंपरेने किंवा विवेकबुद्धीने अंगीकारलेली जीवनपद्धती म्हणजेच स्वधर्म असून अशा स्वधर्माचं निष्ठेने पालन करणाऱ्यालाच भगवंतांची भेट घडते, असे प्रतिपादन ह.भ.प. आफळेबुवा यांनी केले. येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित दशकपूर्ती कीर्तनमालेतील ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ या आख्यानातील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. या कीर्तनसेवेचे सादरीकरण विशाखा चितळे यांनी केले.
निरूपणाच्या पूर्वरंगात “आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया” या अभंगाच्या आधारे आफळेबुवांनी स्वधर्म, उपासना आणि सेवेचे महत्त्व विशद केले. स्वतः पुण्यसंचय करता आला नाही, तरी उपासकाच्या सेवेचा लाभ चरणसेवा, चरणस्पर्श किंवा अभिवादनातून मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. एखाद्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणे, पाठीवर थोपटून आधार देणे यामुळे आपल्याकडील पुण्याचा अंश समोरच्या व्यक्तीला प्राप्त होतो. याच भावनेतून आपल्या संस्कृतीत नमस्कार व चरणस्पर्शाची परंपरा रूढ झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात त्यांनी भागवतातील इंद्रद्युम्न राजा आणि मगराची कथा सांगून चरणस्पर्शाचे महत्त्व अधोरेखित केले. विष्णुभक्ताच्या चरणांचा स्पर्श झाल्याने शापग्रस्त मगरालाही विष्णुलोक प्राप्त झाला, ही कथा सेवेच्या आणि भक्तिसंपर्काच्या प्रभावाचे दर्शन घडवते, असे आफळेबुवा म्हणाले.
“गीता-भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे” या ओळींचा संदर्भ देत त्यांनी “स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः” या तत्त्वावर प्रकाश टाकला. यासाठी त्यांनी सावता माळी यांची कथा सांगितली. शेती हा आपला स्वधर्म न सोडता सावता माळी वारीला गेले नाहीत, तरी त्यांच्या पुण्याईमुळे स्वतः विठ्ठल त्यांच्या मळ्यात दर्शनास आला. त्यांच्या भक्तीमुळे इतरांनाही विठ्ठलदर्शनाचा लाभ झाला. म्हणूनच तुकाराम महाराज अशा उपासकांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात, असे सांगत सेवा शब्दाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
उत्तररंगात आफळेबुवांनी ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ या आख्यानात पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्या कारकीर्दीचा सविस्तर आढावा घेतला. शाहू महाराजांकडे पेशव्यांविरोधात अनेक तक्रारी असूनही शाहूंनी निस्पृह न्यायनिवाडा करत नानासाहेबांचे पेशवेपद कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कारकीर्दीत चित्रदुर्ग, गुजरात, ओरिसा आदी प्रदेश हिंदवी स्वराज्यात सामील झाले. बुंदेलखंडातील समेट, तुळाजी आंग्रेंचे बंड मोडून काढणे, इंग्रज व पोर्तुगीजांना आवर घालणे अशा महत्त्वाच्या घडामोडी त्यांनी विशद केल्या.
राजधानी साताऱ्याहून पुण्यास हलवण्याबाबत शाहू महाराजांनी दिलेल्या अधिकारानंतरही नानासाहेबांनी भोसले घराण्याचा मान राखत पेशवेपद शाहू महाराजांकडूनच स्वीकारण्यावर भर दिला. पुणे राजधानी झाल्यानंतर त्यांनी शहररचना, शेती व जलसंधारण यांसारखी लोकहितकारी कामे दूरदृष्टीने राबवली. परकीय आक्रमणांपासून हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी व्यापक स्वधर्म पाळत अखंड प्रयत्न केल्याचे आफळेबुवांनी सांगितले.
अशा थोर व्यक्तींची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळावे आणि प्रत्येकाने आपल्या स्वधर्माचे कठोर पालन करावे, असा संदेश देत आफळेबुवांनी कीर्तनमालेतील दुसऱ्या पुष्पाची सांगता केली.
