सावर्डे गटात दोन माजी सभापती आमनेसामने?

 

सावर्डे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सावर्डे जिल्हा परिषद गटातील संभाव्य लढत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. उबाठा सेनेच्या माजी सभापती व माजी खासदार विनायक राऊत यांच्या कट्टर समर्थक असलेल्या सौ. धनश्रीताई शिंदे या येत्या एक-दोन दिवसांत शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.

विशेष म्हणजे सावर्डे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती व आमदार शेखर निकम यांच्या पत्नी सौ. पूजाताई निकम यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सौ. धनश्रीताई शिंदे यांनी दर्शवली आहे. त्यामुळे या गटात दोन माजी सभापती आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरण्याचे संकेत आहेत.

आपल्या पूर्व विभागातील पारंपरिक गट सोडून दुसऱ्या गटातून निवडणूक लढवण्याचा सौ. शिंदे यांचा निर्णय तालुक्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. त्या उबाठा सेनेच्या महिला जिल्हा उपसंघटक म्हणून कार्यरत होत्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या उबाठाकडून प्रचारात आघाडीवर होत्या. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होऊनही पक्ष नेतृत्वाकडून ठोस हालचाली न झाल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी सौ. शिंदे यांनी अलोरे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी केली होती. त्या गटातील प्रत्येक गावात त्यांनी प्रभावी जनसंपर्क प्रस्थापित केला होता. मात्र अलोरे गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचे गणित बदलले. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, सावर्डे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सौ. पूजाताई निकम निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून, त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. स्थानिक उमेदवार असल्याने हा मतदारसंघ त्यांना चांगलाच परिचित आहे. त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराची शिवसेनेला उणीव भासत होती. अशा परिस्थितीत ‘जे होईल ते होईल, निवडणुकीला सामोरे जायचे’ या भूमिकेतून सौ. धनश्रीताई शिंदे यांनी सावर्डे गटातून शिंदे सेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

संबंधित लेख