सायले गवळीवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- by Yogesh Bandagale
- December 23, 2025
- 159 views
संगमेश्वर | प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील सायले गवळीवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक आणि पक्षविरहीत विकास कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा पवार गट) अधिकृत प्रवेश केला. राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास यानिमित्ताने स्पष्टपणे दिसून आला.
या वेळी विनोद भालेकर, सुनील भालेकर, गणपत महाडीक, राजाराम भालेकर, सखाराम भालेकर, सुरेश भालेकर, संतोष भालेकर, संदीप भालेकर, विकास भालेकर, नितीन भालेकर, तुकाराम भालेकर, गणपत भालेकर, अनिल भालेकर, यशवंत भालेकर तसेच पांडूरंग कांबळे आदी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
आमदार शेखर निकम यांनी आजवर पक्षभेद न करता रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी विविध विकासकामे सातत्याने मार्गी लावली आहेत. “नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू” या भूमिकेतून त्यांनी तालुक्यातील अनेक रखडलेली कामे पूर्णत्वास नेली असून त्याचा थेट लाभ सामान्य नागरिकांना मिळत आहे.
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले,
“माझ्या राजकारणाचा पाया मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास हा आहे. गावाचा प्रश्न माझा प्रश्न आहे. तो सोडवताना कोणत्या पक्षाचा आहे हे मी कधीही पाहिले नाही. काम करणारे कार्यकर्ते आणि प्रामाणिक ग्रामस्थांना सोबत घेऊनच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे.”
या प्रवेशप्रसंगी संकेत खामकर, दीपक कदम, अमोल चव्हाण, उदय कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सायले गवळीवाडीतील या सामूहिक प्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली असून, आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
