सलग तिसऱ्या वर्षी ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’

चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला’ सलग दोन वर्षे मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता तिसऱ्या वर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात, दि. ५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत बहाद्दरशेख नाका येथील चिपळूण नगर परिषदेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानावर वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन २०२६ (कृषी महोत्सव) भरवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.

सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या कृषी महोत्सवामुळे चिपळूण आणि कोकण परिसर ‘कोकण कृषीची पंढरी’ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास यावेळी प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी व्यक्त केला.

कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना अनेक वर्षांपासून रुजलेली होती. मात्र, या मानसिकतेला छेद देत अत्याधुनिक व परिपूर्ण दुग्ध प्रकल्प उभारून मे. वाशिष्ठी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाने अल्पावधीतच दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

कोकणातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळावी, आर्थिक समृद्धी साधता यावी आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने स्टेट बँक ऑफ इंडिया, बहाद्दरशेख नाका शाखेच्या आर्थिक सहाय्याने या दुग्ध प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि.चे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नियोजनबद्ध कामामुळे अल्पावधीतच हा अत्याधुनिक प्रकल्प उभा राहिला.

५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने, तर उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

कोकणात यापूर्वी दुग्ध प्रकल्प उभारण्याचे काही प्रयत्न झाले; मात्र विविध कारणांमुळे ते अल्पावधीतच बंद पडले. त्यामुळे दुग्ध व्यवसायाबाबत नकारात्मक मानसिकता निर्माण झाली होती. ही मानसिकता बदलून कोकणातील शेतकरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे सक्षम आणि स्पर्धात्मक व्हावेत, हे स्वप्न सुभाष चव्हाण यांनी पाहिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सलग दोन वर्षे वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पहिल्या वर्षी तीन दिवसांचे प्रदर्शन होते, तर प्रचंड प्रतिसादामुळे गतवर्षी पाच दिवसांचे आयोजन करण्यात आले. कोकणातील हा पहिलाच कृषी प्रदर्शनाचा प्रयोग असून लाखो कृषीप्रेमी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यंदाही हे प्रदर्शन पाच दिवस चालणार असून, तिसऱ्या वर्षीही अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी व कृषीप्रेमींनी या कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. स्टॉल नोंदणीसाठी
? ९४२२६६११९७, ९६३७६०५७५७, ७५८८३३००११, ९८९०३९३८२३, ७७२२०४५०४८
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी केले आहे.

 

संबंधित लेख