सरकारी नोकरीच्या आमिषाने आठ जणांची ४०.८५ लाखांची फसवणूक

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात ‘सरकारी नोकरी लावून देतो’ असे आमिष दाखवून तब्बल आठ जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात महेश भास्कर म्हात्रे (रा. जिते, पेण, जि. रायगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत आरोपीने नोकरीच्या नावाखाली २४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

या फसवणूकप्रकरणी नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०, रा. बुरंबाड, वरचा वठार, शेवरवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. शेती व्यवसाय करणाऱ्या रसाळ यांना आरोपीने स्वतःची ओळख प्रभावशाली व्यक्ती म्हणून करून देत सरकारी खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून रसाळ यांच्याकडून आरोपीने ६ लाख रुपये घेतले. याचप्रमाणे अन्य सात जणांनाही नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण १८ लाख २५ हजार रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

मात्र, आरोपीने कोणालाही सरकारी नोकरी लावली नाही. तसेच घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन रसाळ यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार ७ जानेवारी २०२६ रोजी महेश म्हात्रे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपीने जनता सहकारी बँक, शाखा चिपळूण तसेच एचडीएफसी बँक, शाखा चिपळूण येथून कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे. या कर्जाच्या आधारे त्याने चारचाकी व दुचाकी वाहने तसेच दोन मोबाईल फोन खरेदी केले आहेत. मात्र, मे २०२४ पासून कर्जाचे हप्ते न भरल्याने १६ लाख ६० हजार ५८४ रुपयांची रक्कम थकीत असून, बँकांचीही आर्थिक फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने फोनवरून शिवीगाळ करत ‘तुझी वाट लावीन, तुझी बदनामी करीन’ अशी धमकी दिल्याचा उल्लेखही फिर्यादीत करण्यात आला आहे.

नोकरीच्या आमिषाने नागरिकांची २४ लाख २५ हजार रुपये तसेच बँकांची १६ लाख ६० हजार ५८४ रुपये, अशा एकूण ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख