समाजातील सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य कौतुकास्पद – रोहन बने
- by Yogesh Bandagale
- December 25, 2025
- 69 views
डिंगणी येथे ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न
देवरूख प्रतिनिधी : तालुक्यातील डिंगणी खाडेवाडी येथे पालकमंत्री नाम. उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी आणि मैत्री ग्रुप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामीण भागातील नागरिकांना सहज, सुलभ आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, आजारांचे लवकर निदान व वेळेत उपचार व्हावेत, आरोग्याविषयी जागरूकता वाढावी तसेच वंचित घटकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुधीर चाळके यांनी दिली. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमुळे समुदायाचे आरोग्य सुधारावे आणि नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात बचत व्हावी, हाही या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आरोग्य शिबिरामध्ये रक्ततपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, डोळ्यांची तपासणी आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला, आजारांवर मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याबाबत योग्य दिशा मिळाली.
या शिबिराचा एकूण ७५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. अनेक नागरिकांनी मोफत तपासणी व तज्ञांचा सल्ला मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाला शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी रोहन बने म्हणाले की, “सुगम आरोग्य सेवा, लवकर निदान व उपचार, आरोग्य शिक्षण, खर्चात बचत आणि सामुदायिक आरोग्य सुधारणा या दृष्टीने अशी आरोग्य शिबिरे अत्यंत महत्त्वाची आहेत. आरोग्य सेवा आणि जनजागृती यांच्यातील हा दुवा समाजातील सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवतो, हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.”
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर चाळके, अंकेश चाळके आणि सुदर्शन मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
