सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयाचे क्रीडा संग्रामात भरघोस यश

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संस्थांतर्गत स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संस्थांतर्गत क्रीडा स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी–चिंचघरी सती, ता. चिपळूण येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भरघोस यश संपादन केले.

सह्याद्री शिक्षण संस्थेचा क्रीडा संग्राम नुकताच सावर्डे येथील क्रीडा नगरीत उत्साहात पार पडला. या स्पर्धांमध्ये लंगडी, ५० मीटर धावणे व ५० मीटर रिले अशा विविध मैदानी खेळांचा समावेश करण्यात आला होता. चुरशीच्या झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनेक पदके पटकावली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शाळेच्या शिक्षिका अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे व ज्योती चाळके यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्धांमध्ये शाळेचा कु. स्मित विजय घाणेकर याने ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मुलांच्या रिले संघाने द्वितीय, मुलींच्या लंगडी संघाने द्वितीय, तर मुलांच्या लंगडी संघाने तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या यशामागे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत व शाळा व्यवस्थापनाची प्रेरणा मोलाची ठरली. विजयी विद्यार्थ्यांचा सह्याद्री क्रीडा संग्रामचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम, तसेच संस्थेचे सचिव श्री. महेश महाडीक व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रके व पदके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचेही कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळाली असून, भविष्यातील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

संबंधित लेख