संस्थेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा संपन्न

सहकारातून परिवर्तनाची दिशा; चिपळूण नागरीचा प्रवास समाधान देणारा” – सुभाषराव चव्हाण

चिपळूण (प्रतिनिधी) :  “सहकारातून इथल्या गरजू व शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्माण व्हावा, या भावनेतून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली आणि आज त्या उद्दिष्टाची पूर्तता झाल्याचे समाधान आहे,” असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे शेतकरी स्वावलंबी होत असून, त्यातून परिवर्तनाचे नवे युग सुरू झाल्याचे ते म्हणाले. “आपण या वाटेने पुढे गेलो, तर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३२ वा वर्धापनदिन आणि दुग्ध उत्पादक प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा चिपळूण बहादूरशेख नाका येथील सहकार भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांचा ७५ वा वाढदिवस देखील जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास माजी सहनिबंधक (लेखापरीक्षा) महाराष्ट्र राज्य पुणे येथील तानाजी कवडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक साबळे, संचालक अशोक कदम, सूर्यकांत खेतले, मनोहर मोहिते, तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी चिपळूण नागरीच्या माध्यमातून कर्ज घेऊन दुग्ध व्यवसायात प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात सुभाषराव चव्हाण यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते.

“चिपळूण नागरी म्हणजे सहकारातील विद्यापीठ” – तानाजी कवडे

“चिपळूण नागरी ही सहकारातील विद्यापीठ आहे. सामूहिक प्रगतीचा दीपस्तंभ आहे. विश्वास, परिश्रम आणि प्रामाणिकतेचा संगम जिथे असतो, तिथेच यश मिळते,” असे माजी सहनिबंधक तानाजी कवडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, “महाराष्ट्रात चिपळूण नागरीसारखी क्वचितच एखादी संस्था असेल जी सभासदांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे करते. सभासदांना एकत्र आणणे हा सहकाराचा पाया आहे.”
कवडे यांनी पुढे संस्थेचे कौतुक करत सांगितले, “मी स्वतः या संस्थेचा सभासद होऊ इच्छितो,” असे म्हणत दोन लाख रुपयांच्या ठेवीचा धनादेश त्यांनी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.

वाशिष्ठी डेअरीच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “वाशिष्ठीची दूधगंगा अशीच पुढे वाहत राहो. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे आपल्या घरचा गौरव आहे. आत्मविश्वास निर्माण झाला की शेतकरी कधीही मागे वळून पाहत नाही. कोकण भात व नारळ पिकांची भूमी असली तरी आज ती दुग्ध उत्पादक भूमी बनली आहे — हा खरा सहकाराचा विजय आहे.”

वाशिष्ठी डेअरीकडून ७८ लाखांचा बोनस – प्रशांत यादव यांची घोषणा

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी चिपळूण नागरीच्या कार्याचे आणि सहकारातील योगदानाचे कौतुक करत सांगितले, “या संस्थेमुळे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळाला. छोट्या व्यवसायांना चालना मिळाली आणि सहकार चळवळीला नवी दिशा मिळाली.”

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिष्ठी डेअरी अंतर्गत ११,२८० दूध उत्पादक शेतकरी असून दररोज गाईचे ३४,६५४ लिटर आणि म्हशीचे २०,५५० लिटर दूध संकलन केले जाते. दर दहा दिवसांनी २ कोटी ९४ हजार १७६ रुपये इतकी बिले शेतकऱ्यांना अदा केली जातात.

सध्या ७८ संकलन केंद्रे कार्यरत असून खेड, मंडणगड, दापोली, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी व चिपळूण या ठिकाणी दूध संकलन चालते. दररोजची विक्री २५,५५१ किलो असून २० लाख ८३ हजार ३८७ रुपये इतके दैनिक उत्पन्न मिळते. मासिक विक्री ११,१२,३२६ किलो इतकी असून उत्पन्न ६ कोटी ८६ लाख ७२ हजार २५२ रुपये आहे.

डेअरीत ५९ शॉपी, २३५ कर्मचारी कार्यरत असून कोकणातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. गेल्या वर्षी ७,५४२ शेतकऱ्यांना ४८ लाख ६५ हजार ७५४ रुपये, तर यावर्षी १३,५४६ शेतकऱ्यांना ७८ लाख ५६ हजार ४४१ रुपये इतका बोनस देण्यात येणार असल्याचे यादव यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

संबंधित लेख