संगमेश्वर वारकरी संप्रदायाची वार्षिक बैठक उत्साहात; कार्तिकी वारीसाठी उत्स्फूर्त तयारी

संगमेश्वर (प्रतिनिधी) : रामकृष्ण हरीच्या गजरात वारकरी संप्रदायाची वार्षिक बैठक ह. भ. प. संदिप सावरटकर यांच्या निवासस्थानी भक्तीभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. परंपरेप्रमाणे यंदाही कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरात नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

बैठकीत वारकरी संप्रदायाची सांस्कृतिक व आध्यात्मिक विचारधारा घराघरात पोहोचविणे, दिशाहीन तरुणाईला भक्तीमार्गावर प्रवृत्त करणे तसेच संप्रदायाच्या उपक्रमात नव्या पिढीचा सहभाग वाढविणे या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. यंदाच्या कार्तिकी वारीत संगमेश्वर तालुका सर्व आयोजनात अग्रेसर राहील, असा ठाम विश्वास वारकऱ्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत ह. भ. प. सुरेश भायजे यांनी मार्गदर्शन करून वारकरी चळवळीच्या सातत्यपूर्ण कार्याची महती पटवून दिली. प्रमुख मान्यवरांमध्ये अध्यक्ष ह. भ. प. रमेश बांडागळे (मुरादपूर), उपाध्यक्ष ह. भ. प. नंदकुमार लिंगायत (तुरळ), सचिव ह. भ. प. संजय कानाल (चिखली) आणि खजिनदार ह. भ. प. सुनील करंडे (माळवाशी) आदींचा समावेश होता.

तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या सुमारे १५० वारकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेचा समारोप सामूहिक पसायदान पठणाने झाला. भक्तीमय वातावरणात पार पडलेली ही बैठक आगामी कार्तिकी वारीच्या यशस्वी आयोजनाचा दृढनिश्चय व्यक्त करणारी ठरली.
 

संबंधित लेख