संगमेश्वर रेल्वे स्थानकावर पोरबंदर व जामनगर एक्सप्रेसचे जंगी स्वागत
- by Yogesh Bandagale
- December 29, 2025
- 129 views
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याच्या रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान संगमेश्वरवासीयांना लाभला. दीर्घ काळाच्या संघर्षानंतर पोरबंदर एक्सप्रेस आणि जामनगर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळाल्यानंतर या गाड्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत भव्य व जंगी स्वागत करण्यात आले.
पहिल्या दिवशी पोरबंदर एक्सप्रेस संगमेश्वर स्थानकात दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद आणि जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी जामनगर एक्सप्रेसचेही तितक्याच उत्साहात स्वागत करत नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला. सलग दोन दिवस रेल्वे स्थानक परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
या ऐतिहासिक यशामागे गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, आंदोलने, उपोषणे आणि लोकशक्तीचा मोठा वाटा आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी लढा देणाऱ्या सर्व कार्यकर्ते, नागरिक तसेच पत्रकार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यामुळे आता संगमेश्वर व परिसरातील नागरिकांना थेट गुजरातकडे प्रवास करणे अधिक सुलभ झाले आहे. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार तसेच भाविक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार असून जलद आणि सोयीस्कर प्रवासामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
हा थांबा म्हणजे संघर्षातून मिळालेला विजय असल्याची भावना व्यक्त करताना निसर्गरम्य चिपळूण–संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या यशासाठी ग्रुपचे सदस्य समीर सप्रे, दीपक पवार, जगदीश कदम, गणपत दाभोळकर, रुपेश कदम, अशोक मुंडेकर, जी. झेड. टोपरे, मंगेश बाईत आदींनी प्रचंड मेहनत घेतली. आंदोलन व संघर्षाच्या काळात पाठबळ बनलेल्या तालुक्यातील जनतेचाच हा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
