लोटे परशुराममधील पिफास रसायनांवर तातडीची कारवाई करा
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 120 views
मुंबई / चिपळूण, दि. १४ (प्रतिनिधी): कोकणातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीकडून इटलीतील मिटेनी कंपनीच्या तंत्रज्ञानावर आधारित पिफास (PFAS) – कधीही न नष्ट होणारी विषारी रसायने तयार केली जात असून, यामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर गंभीर व दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यसभा खासदार व माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून २० जानेवारी २०२६ पूर्वी भेटीची वेळ देण्याची विनंती केली आहे. पिफास ही रसायने कधीही नष्ट होत नाहीत, विघटन पावत नाहीत व दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात. त्यामुळे परिसरातील भूजल, जलस्रोत, शेती, पशुधन तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचे दलवाई यांनी नमूद केले आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या पिफास उत्पादनाच्या विरोधात ८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर भव्य व शांततामय आंदोलन केले होते. हे आंदोलन ‘लक्ष्मी ऑरगॅनिक पिफास विरोधी संघर्ष समिती’च्या वतीने करण्यात आले होते.
तसेच लोटे औद्योगिक परिसरातील विनाटी ऑरगॅनिक, एक्सेल इंडस्ट्रीज, सुप्रिया केमिकल्स आणि घारडा केमिकल्स या रासायनिक उद्योगांमुळेही परिसरात प्रदूषण वाढत असून, नागरिकांना श्वसनविकार, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, फुफ्फुसांचे आजार तसेच त्वचारोगांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचे दलवाई यांनी पत्रात नमूद केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून लोकहितासाठी संबंधित उद्योगांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची क्षमता राज्य शासनाकडे असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच लक्ष्मी ऑरगॅनिकसह इतर रासायनिक उद्योगांच्या उत्पादनांचा या भागातील मानवी जीवन, पशुसृष्टी व निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासकांची स्वतंत्र समिती स्थापन करून सखोल अभ्यास अहवाल तयार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व गंभीर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर व २० जानेवारी २०२६ पूर्वी अर्ध्या तासाची भेट देण्यात यावी, अशी नम्र विनंती दलवाई यांनी केली आहे. भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर किमान दोन दिवस आधी कळविण्यात यावे, जेणेकरून संबंधित भागातील १४ ते १५ नागरिकांच्या शिष्टमंडळासह उपस्थित राहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
