लोटे एमआयडीसीतील PFAS उत्पादन तात्काळ बंद करा

चिपळूण : लोटे परशुराम एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीची उपकंपनी ‘यलो स्टोन फाईन केमिकल कंपनी’ PFAS (Per and Poly Fluoro Alkyl Substances) संबंधित उत्पादने तयार करीत असून ही उत्पादने तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी कोकण नागरी संघर्ष समिती (कोकण विभाग) महिला संघटन यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, PFAS उत्पादनाबाबत भारतात कोणतेही ठोस कायदे अस्तित्वात नसताना या कंपनीला पर्यावरणीय मंजुरी देताना अ‍ॅप्रायझल कमिटीने पुरेसा विचार केलेला नाही. या पार्श्वभूमीवर ८ जानेवारी २०२६ रोजी कंपनीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र कंपनी व्यवस्थापनाने चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तर दिले नसल्याने २१ जानेवारी २०२६ पासून कंपनी गेटसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आज २९ दिवस पूर्ण करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप महिला संघटनांनी केला आहे.

कोकण नागरी संघर्ष समितीचे सदस्य श्री. उदय दत्तात्रय घाग यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती ‘तृतीय पक्षाशी संबंधित’ असल्याचे कारण देत नाकारण्यात आल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. ही माहिती जनतेच्या जीविताशी संबंधित असल्याने ती देणे प्रदूषण नियंत्रण मंडळावर बंधनकारक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे एमपीसीबी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्याचा दावा केला असला, तरी PFAS उत्सर्जनाबाबत देशात कोणतीही ठोस कायदेशीर चौकट नसल्याने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच इटलीतील मिटेनी एस.पी.ए. कंपनीकडून जुनी यंत्रसामग्री, पेटंट व उत्पादन सूत्रे खरेदी करून लोटे एमआयडीसीतील प्लॉट क्र. G-60 येथे २०२३ पासून उत्पादन सुरू करण्यात आले, आणि जानेवारी २०२५ पासून PFAS उत्पादनाची चाचणी व प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले, अशी माहिती माध्यमांना देण्यात आल्याचेही नमूद आहे.
मिटेनी कंपनीमुळे इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होऊन ३.५ लाख नागरिक बाधित झाले व ४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असा इतिहास असल्याने कोकणात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून PFAS उत्पादन बंद करावे, अशी ठाम मागणी महिला संघटनांनी केली आहे.

जर संबंधित माहिती तात्काळ सार्वजनिक करण्यात आली नाही व PFAS उत्पादनावर कारवाई झाली नाही, तर पुढील महिन्यात जिल्ह्यातील महिलांचा मोठा मोर्चा एमपीसीबी कार्यालयावर काढून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना रंजीता उतारी, स्मिता खंदारे, अंजली चव्हाण, तृप्ती कदम, स्वाती भोजने, दीपिका कोतवडेकर, नेहा धुमाळ, देवयानी हरद्वारे, संगीता लोटे, नीलम वाडकर, अनिता पवार आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

संबंधित लेख