राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरुखचे विलास रहाटे प्रथम
- by Yogesh Bandagale
- October 27, 2025
- 73 views
देवरुख : युथ फोरम, देवगड आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनात देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांकावर आपली कलाकौशल्याची छाप उमटवत मानाचा बहुमान पटकावला आहे. ‘विविध परंपरा आणि धर्मातील व्यक्तीचित्रे’ हा विषय देण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी रहाटे यांनी तीन फूट बाय चार फूट आकारातील रांगोळीद्वारे उत्तर पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशातील अपातानी समाजातील वृद्ध महिलेला साकारले.
या रांगोळीत त्या समाजाची पारंपरिक वेशभूषा, चेहऱ्यावरचे सांस्कृतिक टॅटू, कानातील विशेष मोठे दागिने आणि वैशिष्ट्यपूर्ण मुखरेषा यांचे सूक्ष्म आणि अत्यंत बारकाईने चित्रण करून त्यांनी परीक्षकांची आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. रंगसंगती, सूक्ष्म रेषाकार आणि वास्तवदर्शी सादरीकरणामुळे रहाटे यांची रांगोळी या स्पर्धेत ठळकपणे उठून दिसली.
प्रथम क्रमांकासाठी त्यांना रु. १५,०००/- रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यांतील अनेक कुशल रांगोळी कलाकारांनी सहभाग नोंदवला होता, मात्र विलास रहाटे यांच्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत यश आपल्या झोळीत घातले.
दरम्यान, या स्पर्धेत साकारलेल्या सर्व रांगोळ्यांचे प्रदर्शन २५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. कला प्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या कलादर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
