रस्त्यात सापडलेली तीन लाखांची रक्कम केली परत; सुनील होरंबे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक!
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 101 views
संगमेश्वर (प्रतिनिधी): माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालणारी घटना संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. शिवने (होरंबेवाडी) येथील बांधकाम कारागीर सुनील गणपत होरंबे यांनी रस्त्यात सापडलेली तब्बल तीन लाख रुपयांची रोख रक्कम शोध घेऊन संबंधित मालकाला अत्यंत प्रामाणिकपणे परत केली. त्यांच्या या प्रामाणिक कृत्याबद्दल शिवने गावासह संपूर्ण परिसरातून त्यांचे जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे.
घटनेविषयी माहिती अशी की, सुनील होरंबे हे काही कामानिमित्त बुरंबी येथे गेले होते. सकाळच्या सुमारास ते बुरंबी ते शिवने या मार्गाने दुचाकीवरून परतत असताना त्यांच्या पुढे एक दुचाकीस्वार जात होता. त्याच्या दुचाकीवरून अचानक एक प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर पडली. या पिशवीतून काही नोटा रस्त्यावर विखुरल्या. हे दृश्य पाहून सुनील होरंबे यांनी तात्काळ दुचाकी थांबवली, त्या नोटा गोळा करून पिशवीत भरल्या आणि संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊ लागले.
मात्र संगमेश्वरपर्यंत शोध घेतल्यावरही तो व्यक्ती सापडला नाही. अखेर त्यांनी पिशवीतील कागदपत्रे तपासली असता, त्यात सरकारी स्लिप आढळली ज्यावर पैसे कोणत्या कार्यालयात भरायचे आहेत याची माहिती होती. त्या आधारे सुनील होरंबे यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला.
संपर्क झाल्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्याने सांगितले की, “मी कर्जाची रक्कम भरायला जात होतो, पण पिशवी हरवली.” रक्कम सुरक्षित मिळाल्याचे कळताच तो आनंदाने भारावून गेला.
होरंबे यांनी सर्व खातरजमा करून तीन लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष त्या कर्मचाऱ्याला परत केली. संबंधितांनी त्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून देऊ केली, मात्र सुनील होरंबे यांनी ते नम्रपणे नाकारले.
या घटनेने प्रामाणिकतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे.
गावकऱ्यांसह परिसरातील लोकांनी सुनील होरंबे यांचे कौतुकाचे पूर ओतले असून, “आजच्या काळातही अशी माणसे आहेत हीच खरी समाजाची ताकद आहे,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
