रमेश कदम-भास्कर जाधव यांच्या तीन दशकांच्या वैराची युती जनतेने नाकारली
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 40 views
चिपळूण: चिपळूणच्या राजकारणात गेल्या ३०–३५ वर्षांपासून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे नेते आमदार भास्करशेठ जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार, माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. या कालखंडात दोघांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले, उघड आव्हाने दिली गेली आणि १९९५ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तर संघर्ष टोकाला गेला होता.
मात्र, चिपळूण पालिका निवडणुकीच्या निमित्ताने हे कट्टर राजकीय वैरी एकत्र आले. इतक्या वर्षांच्या शत्रुत्वानंतर ही युती नेमकी कशासाठी, आणि निवडणुकीत नेमकं काय साध्य करायचं होतं—हे प्रश्न शहरात चर्चेचा विषय ठरले. ही बाब चिपळूणच्या जनतेच्या लक्षात आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
जनतेने या अनपेक्षित युतीला ठाम नकार देत रमेश कदम–भास्कर जाधव या दोन्ही नेत्यांना मतपेटीतून नाकारले. त्याऐवजी शिवसेना–भाजप महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांच्या कामावर विश्वास ठेवत त्यांना भरभरून कौल दिला.
चिपळूणचा विकास प्रामाणिकपणे पुढे नेण्याची क्षमता उमेश सकपाळ यांच्यात आहे, असा विश्वास व्यक्त करत मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामुळे स्वार्थी राजकीय गणितांपेक्षा विकास आणि विश्वासाला प्राधान्य देणारा हा कौल—चिपळूण नगरपालिका निवडणुकीचे खऱ्या अर्थाने विश्लेषण ठरत आहे.
