रत्नागिरीतील ४७ हजार महिलांची नावे वगळली
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 295 views
रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ४७ हजार लाभार्थी महिलांची नावे छाननीनंतर वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थींना मिळालेला नाही.
योजनेत आता केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याने आगामी काळात आणखी काही लाभार्थी महिलांची नावे रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ४७७ महिला लाभार्थी या योजनेत नोंदणीकृत आहेत.
तालुकानिहाय लाभार्थी महिलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे –
चिपळूण : ६१,५९२
दापोली : ४३,६१८
गुहागर : ३२,२३३
खेड : ४०,६८२
लांजा : २५,०८४
मंडणगड : १५,४५३
राजापूर : ३९,९३५
रत्नागिरी : ७१,४५४
संगमेश्वर : ४७,४२६
लाभार्थींची नावे वगळण्यात येणे तसेच हप्त्याच्या विलंबामुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट भूमिका व तातडीने निधी वितरणाची मागणी होत आहे.
