रत्नागिरीच्या डॉ. अतुल ढगे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान
- by Yogesh Bandagale
- December 20, 2025
- 59 views
रत्नागिरी : मानसिक आणि लैंगिक आरोग्य या संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने जनजागृती, उपचार, प्रशिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रत्नागिरी येथील माईंड केअर हॉस्पिटलचे संस्थापक, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिकतज्ज्ञ डॉ. अतुल डी. ढगे यांना ‘Global Leader in Mental & Sexual Health Awareness – 2025’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान Saksham International Business Awards 2025 अंतर्गत दुबई (UAE) येथील हॉटेल अल खोरी स्काय गार्डन येथे पार पडलेल्या भव्य समारंभात देण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रेबेका जे. डाल, अध्यक्षा – Global Academic Forum (GAF), United States यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. ढगे यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. अतुल ढगे गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व लैंगिक आरोग्य क्षेत्रात सामाजिक संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख कार्यपद्धती यांचा प्रभावी समन्वय साधत कार्यरत आहेत. मानसिक आरोग्याविषयी असलेली भीती, गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करण्यासाठी त्यांनी Mindcare Marathon, माईंडकेअर एक्स्प्रेस, जागर मनोआरोग्याचा, मनोमित्र कार्यशाळा तसेच कोविड काळातील Sukoon कार्यक्रम यांसारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
तसेच “Remove Stigma Campaign” च्या माध्यमातून त्यांनी तरुण, विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य जनतेमध्ये मानसिक व लैंगिक आरोग्याबाबत जागरूकतेचा नवा संदेश पोहोचवला आहे.
मानसिक व लैंगिक आरोग्य विषयावर डॉ. ढगे यांनी १००० हून अधिक लेख विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांतून प्रकाशित केले असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत त्यांनी शेकडो व्याख्याने, जनजागृती व्हिडिओ व समुपदेशन मालिका सादर केल्या आहेत.
NIMHANS, बेंगळुरू येथील Professional Skills & Leadership Training (2014) साठी आशियातील केवळ १७ तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली होती. याशिवाय Pride Bharat Award – 2024 (Most Trusted Psychiatrist & Sexologist) हा सन्मान नवी दिल्ली येथे अभिनेता अर्जुन कपूर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला होता.
लैंगिक आरोग्यावरील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली Red Apple Sexual Wellness Clinic ही भारतातील पहिली discreet sexual wellness service ठरली असून, गोपनीय, सुरक्षित व वैज्ञानिक उपचार पद्धतींची नवी दिशा त्यांनी देशभरात निर्माण केली आहे.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. अतुल ढगे म्हणाले,
“ही जागतिक मान्यता माझ्या रुग्णांची, माईंडकेअर टीमची आणि मानसिक व लैंगिक आरोग्य सेवांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाची आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, या क्षेत्रातील कार्याबाबतची माझी वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे.”
