युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
- by Yogesh Bandagale
- December 30, 2025
- 222 views
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी उत्साहात पार पडला.
या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पटवर्धन उपस्थित होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. साईनाथ कपडेकर, सहकार्यवाह श्री. विजय चक्रदेव, संचालक श्री. अभय चितळे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे, शिक्षक प्रतिनिधी श्री. बिराप्पा मोटगी, शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख श्री. विजय केळस्कर, पालक प्रतिनिधी श्री. सुदेश माळी, विद्यार्थी प्रतिनिधी कु. शतांशू शिंदे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. वेदिका कदम तसेच विद्यासमितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
संस्थेच्या गुरुकुल विभागातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेल ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रशालेतील ज्येष्ठ अध्यापिका सौ. वैशाली चितळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. साईनाथ कपडेकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘वंदे मातरम्’ या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी विद्यार्थी व प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील आठवणी सांगत अभ्यंकर रंगमंदिराच्या रंगमंचावरून एकांकिका, वक्तृत्व व विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी शाळेने दिल्याचे नमूद केले. या शाळेने आत्मविश्वास, संघभावना यांसारखी जीवनमूल्ये अनुभवातून शिकवली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या नावातील भगवान परशुरामाप्रमाणे दैदीप्यमान यश मिळवण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करा, यश-अपयश हे जीवनातील गुरू आहेत, कलेने जीवन समृद्ध करा, आपले वेगळेपण ओळखा, आवडीच्या क्षेत्रात काम केल्यास उत्तम करिअर घडते, नियमित व्यायाम करा व शाळेबद्दल सदैव कृतज्ञ राहा, असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शालेय समिती अध्यक्ष श्री. विजय चक्रदेव यांनी स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध यांनी रामायणातील जांबुवंत व छोटी खार यांची कथा सांगत प्रत्येकामधील क्षमता ओळखण्याचे महत्त्व विशद केले. शिक्षक हे त्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेधा लोवलेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फनी गेम्स व चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
