युनायटेड इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात रंगोत्सवाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले
- by Yogesh Bandagale
- December 31, 2025
- 20 views
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण यांच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी रंगोत्सव हा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे श्री. ओंकारजी बापट उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संचालक श्री. सुनील जोशी, श्री. अभय चितळे, मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे, शिक्षक प्रतिनिधी श्री. बिराप्पा मोटगी, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. माळी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कु. शतांशु शिंदे व विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. वेदिका कदम उपस्थित होते.
सौ. दिपा गद्रे मॅडम यांच्या सुस्वर सरस्वती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. वैशाली चितळे यांनी करून दिला. संचालक श्री. सुनील चितळे यांच्या हस्ते श्री. ओंकार बापट यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री. ओंकार बापट यांनी दृकश्राव्य माध्यमातून निसर्ग आख्यान सादर करत विहग वैभव, ताडोबा व्याघ्र प्रकल्प तसेच विविध वन्यजीवांचे मनोहारी दर्शन विद्यार्थ्यांना घडवले. या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी विशेष दाद दिली.
यानंतर युनायटेड प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध जादूगार श्री. उदयकुमार सन्नाक यांनी विविध जादूचे प्रयोग सादर करत विद्यार्थ्यांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांचा सत्कार संचालक श्री. अभय चितळे यांच्या हस्ते करण्यात आला.
मध्यंतरानंतर पालक, पत्रकार व लोककलाकार श्री. योगेश बांडागळे यांनी संगमेश्वरी बोलीतून कोकणातील लोककला विद्यार्थ्यांच्या सहभागाने सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांचा सत्कार स्कूल कमिटी चेअरमन श्री. विजय चक्रदेव यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या रंगतदार कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने सादर झालेल्या शेलापागोटे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
