माजी सभापती धनश्रीताई शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार

चिपळूण :   तालुक्यातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून शिवसेना उबाठा नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या कट्टर समर्थक आणि चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. धनश्रीताई शिंदे या गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार असून, धनश्रीताई शिंदे आपल्या समर्थकांसह पक्षात सहभागी होणार आहेत. या वृत्ताला शिवसेना तालुका प्रमुख रुपेश घाग यांनी दुजोरा दिला आहे.

सौ. धनश्रीताई शिंदे या उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असून सध्या त्या महिला जिल्हा उपसंघटक म्हणून कार्यरत आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत उबाठा शिवसेनेला मोठी पीछेहाट सहन करावी लागली. या निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते विनायक राऊत आणि नेते भास्करराव जाधव यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शहर प्रमुख भैय्या कदम आणि महिला शहर प्रमुख वैशाली शिंदे यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

या अपयशामुळे उबाठा शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे मनोबल खचले असून कार्यकर्ते हतबल झाल्याचे चित्र आहे. अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली असली तरी नेतृत्वाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही. उमेदवार कोण असणार, निवडणूक कशी लढायची याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वरिष्ठ नेते अडकून पडल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सध्या कोणताही आधार मिळत नसल्याची भावना पसरली आहे.

दरम्यान शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी “सर्वांनी मतभेद विसरून एकत्र काम करूया, मी नेतृत्व करायला तयार आहे,” असे आवाहन केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून नाराज व संभ्रमात असलेले कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेकडे वळताना दिसत आहेत. “आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देई ना” अशी अवस्था झालेल्या शिवसैनिकांना आता नव्या नेतृत्वाचा आधार मिळत असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी सभापती सौ. धनश्रीताई शिंदे यांचा शिवसेनेत होणारा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने या प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या घडामोडीमुळे चिपळूण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख