माजी सभापती दिलीप पेंढारी स्वगृही परतले
- by Yogesh Bandagale
- December 20, 2025
- 85 views
देवरूख / सुरेश सप्रे :
माजी पंचायत समिती सभापती व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप पेंढारी यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात शिवसेना उबाठा गटाला बळकटी मिळाली असून विशेषतः मुचरी व कसबा गटात पक्षाची ताकद वाढली असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या प्रवेश सोहळ्यास माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, उपतालुका प्रमुख मनीषा बने, उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर म्हणाले की, शिवसेनेने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. काहीजण स्वार्थापोटी पक्ष सोडून गेले असले तरी खरे शिवसैनिक व मतदार आजही पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये संगमेश्वर पंचायत समितीवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी अधिक जोमाने लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रवेशानंतर बोलताना दिलीप पेंढारी म्हणाले, शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र माने हे पक्षाच्या कठीण काळातही वय व तब्येतीचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीने आपण प्रेरित झालो असून सध्याच्या राजकारणातील घडामोडींमुळे अस्वस्थता वाटत होती. शिवसेनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याच्या उद्देशानेच आपण स्वगृही प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदापर्यंत पोहोचवणारा पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा संघटक संतोष थेराडे यांनी सांगितले की, पक्षात गद्दारी झालेल्या कठीण काळात रवींद्र माने यांनी संघटना सावरण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुन्हा उबाठाशी जोडले जात असून आगामी निवडणुकीत संगमेश्वर तालुक्याचा सभापती पुन्हा भगव्या झेंड्याखालीलच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी सांगितले की, जिल्ह्यासह संगमेश्वर तालुक्यात उबाठा शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहत असून जनतेमध्ये गद्दारांविरोधात तीव्र नाराजी आहे. जनता आगामी निवडणुकांत योग्य धडा शिकविण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
