महिलांच्या आरोग्यजागरूकतेसाठी निगडे कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण (कोळकेवाडी) : दि. ६ जानेवारी २०२६ रोजी वै. ह.भ.प. सौ. सरिता शिवाजी निगडे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, माजी सरपंच – कोळकेवाडी) यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त महिलांसाठी “मासिक पाळी, मानसिक स्वास्थ्य आणि कर्करोग जागरूकता” या विषयावर विशेष आरोग्यजागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री. पुरुषोत्तम शिवाजी निगडे यांनी केले असून पाऊलवाट फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्यजागरूकता सत्र घेण्यात आले.

पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समाजोपयोगी आणि स्त्रीआरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयाला व्यासपीठ उपलब्ध करून देत वै. ह.भ.प. बाबाजी दौ. निगडे (फौजदार) कुटुंबीयांनी संवेदनशील व प्रेरणादायी उपक्रम राबविल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या आरोग्यजागरूकता सत्राचे सादरीकरण सौ. श्रुतिका शिंदे यांनी केले. सत्रामध्ये महिलांना मासिक पाळीचे योग्य व्यवस्थापन, रजोनिवृत्ती काळातील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीशी संबंधित सामान्य समस्या तसेच मासिक पाळी व कर्करोगाविषयी असलेले समज-गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच मानसिक आरोग्याचे महत्त्व, गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय तसेच एचपीव्ही लसीचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपस्थित महिलांनी या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याची भावना व्यक्त केली. वै. ह.भ.प. सौ. सरिता निगडे यांच्या स्मृतीस समर्पित हा आरोग्यजागरूकतेचा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवंदना ठरत असून “ही पाऊलवाट अनेक महिलांच्या आरोग्य-जागरूकतेकडे नेणारी ठरो,” अशी भावना पाऊलवाट फाउंडेशनचे सचिव डॉ. कृपाल शिंदे यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख