महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी – जिजाऊ ब्रिगेडची मागणी
- by Yogesh Bandagale
- September 24, 2025
- 86 views
रत्नागिरी (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर भीषण संकट ओढावले असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत तसेच संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा शाखे तर्फे करण्यात आली आहे.
जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. पंचनामा व प्रशासकीय प्रक्रिया टाळून थेट मदत जाहीर करावी, तसेच सर्व शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी.”
शासनाने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरची चूल पेटेल कशी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल कसा याचा गांभीर्याने विचार करावा, अशी कळकळीची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन माननीय नायब तहसीलदार मोरे साहेब यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, चिपळूण तालुका अध्यक्षा मीनल गुरव, खेड तालुका अध्यक्षा रोहिणी मोरे, तसेच सदस्य दिलबर खान उपस्थित होते.
