महायुतीतून राष्ट्रवादीला ‘अदृश्य’ वागणूक?; चिपळूण नगराध्यक्षपदाचा तिढा कायम
- by Yogesh Bandagale
- November 08, 2025
- 176 views
चिपळूण : नगर परिषद व नगर पंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती एकसंघ राहणार असल्याचे भाजप व शिंदे गटाकडून जोरदारपणे सांगितले जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मात्र या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शुक्रवारी मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या महायुती समन्वय बैठकीत राष्ट्रवादीचा एकही प्रतिनिधी हजर नसल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
दोन दिवसांपूर्वीच आमदार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी–सिंधुदुर्ग दौऱ्यात महायुतीतूनच निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर पालकमंत्री उदय सामंत यांनीही अशाच भूमिका मांडल्या होत्या. मात्र मुंबईतील निर्णायक वाटणाऱ्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. “निमंत्रण न मिळाल्याने उपस्थित राहणे शक्य नव्हते,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
या बैठकीत जिल्ह्यातील आगामी नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणूक पूर्वतयारीवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः चिपळूण नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या जागा वाटपावर मोठे विचारमंथन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या पदासाठी शिंदे गटाला प्राधान्य द्यावे, असा ठाम आग्रह पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत मांडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय नेमका कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे चिपळूणसह जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
या बैठकीस गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, प्रशांत यादव यांसह प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहणार? जागा वाटपात त्यांना किती प्रतिनिधित्व मिळणार? याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातील समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे असल्याची कुरघोडी चर्चा सुरू आहे.
