महाड नगर परिषद निवडणुकीत तुफान राडा
- by Yogesh Bandagale
- December 02, 2025
- 175 views
महाड : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. नवे नगर परिसरात हा प्रकार घडला असून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक, मारहाण आणि गाड्यांची तोडफोड केल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. तसेच जाबरे समर्थकांच्या वाहनांची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. वाढत्या तणावात जाबरे समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती समोर आली असून हा वाद यानंतर अधिकच चिघळला. वाद पेटल्यानंतर विकास गोगावले हे रिव्हॉल्व्हर घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
दरम्यान, सकाळपासून महाड नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याने दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने केंद्राबाहेर जमा झाले होते. त्यावेळी बाचाबाची वाढत जाऊन ती हाणामारीत परिवर्तित झाली.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही सतत तणाव निर्माण होत असल्याचे दिसते. मतदानादरम्यान झालेला गोंधळ हा याच वादाचा उद्रेक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
घडलेल्या प्रकारानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना गोगावले गटावर टीका केली.
“मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार फक्त अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधींना असतो. मात्र, विकास गोगावले मतदान केंद्रात आत जात आहेत, आरओशी वाद घालत आहेत. निवडणुकीत शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी म्हटले.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
