मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे कार्यशाळा उत्साहात

शिरगाव, रत्नागिरी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी आणि कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रम कार्यशाळा – MITRA: Mind In Training For Right Awareness” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० या वेळेत परिषद दालन, मत्स्य तंत्रनिकेतन, शिरगाव येथे पार पडली.

सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाढता ताण-तणाव, भीती, मोबाईलचे व्यसन यांसारख्या नकारात्मक मानसिक स्थितींचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनशैली व शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याचे दिसून येते. शासनाने सन २०१२ पासून शाळांमध्ये राबविलेल्या ‘आनापानसती ध्यान तथा मित्र उपक्रम’ाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक व बौद्धिक पातळीवर सकारात्मक बदल घडून आल्याची नोंद आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर, पालीचे विश्वस्त संतोष आयरे यांनी आनापानसती ध्यान पद्धतीचे महत्त्व, मन एकाग्र ठेवण्याचे तंत्र, तणाव व्यवस्थापन तसेच सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्राच्या समन्वयक श्रीमती ज्योती राजेमहाडीक यांचेही मार्गदर्शन लाभले. “MITRA” या उपक्रमाद्वारे योग्य जागरूकता निर्माण करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यापन सहाय्यक श्रीमती मयुरी डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच नारळ संशोधन केंद्र, भाटेचे प्रमुख श्री. मालशे सर यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व एकाग्रता वृद्धीसाठी उपयुक्त ठरल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख