बिहारमधील तरुण दुचाकीसह ताब्यात
- by Yogesh Bandagale
- January 06, 2026
- 179 views
चिपळूण : बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना चिपळूण पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले. मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती न देता आल्याने संबंधित तरुणाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता बहादूरशेख येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बहादूरशेख नाका ते कराडकडे जाणाऱ्या मार्गावर चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे हे वाहतूक नियमनाचे काम करत होते. यावेळी राजाकुमार दिनेश मंडल (वय २०, रा. सुखवासी, जि. मधुबनी, राज्य बिहार) हा तरुण एम.एच.०८ बी.जे. ०८४७ क्रमांकाच्या मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला थांबवून वाहनाबाबत चौकशी केली असता, संबंधित तरुणाला मोटारसायकलच्या मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत तसेच समाधानकारक उत्तरही देता आले नाही. त्यामुळे सदर दुचाकी चोरीची असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी ती जप्त केली.
या प्रकरणी आरोपी राजाकुमार मंडल याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
