निष्ठा महत्त्वाची, नाटके नाहीत; उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना इशारा
- by Yogesh Bandagale
- October 18, 2025
- 115 views
चिपळूणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
चिपळूण (प्रतिनिधी) : “निवडणुका जाहीर झाल्या की कार्यालयात गर्दी वाढते. ‘साहेब मी तुमच्या हृदयात आहे’, ‘मी तुमचा उजवा हात’, ‘मी तुमचा डावा हात’ अशी वाक्ये ऐकू येतात. पण निवडणुकीपुरतेच सक्रिय होणाऱ्यांना या वेळी स्थान मिळणार नाही. केवळ पक्षाशी निष्ठावंत आणि सातत्याने काम करणाऱ्यांनाच तिकीट दिले जाईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगत राज्याचे उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. माजी आमदार सदानंद चव्हाण, गुहागरचे माजी सभापती राजेश बेंडल, रुपेश घाग, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जि. प. सदस्य शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख बापू आयरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, उमेश सकपाळ, रश्मीताई गोखले, विनोद झगडे, प्राजक्ता टकले यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, “निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक उमेदवार समोर येतात. काही जण पक्षाच्या कार्यात कधी दिसत नाहीत, पण तिकीट मिळावे म्हणून अचानक पुढे येतात. असे प्रकार यावेळी चालणार नाहीत. जो पक्षासाठी, जनतेसाठी आणि संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करेल, त्यालाच संधी मिळेल.”
महायुतीबाबत बोलताना ते म्हणाले, “महायुती होईल याबद्दल माझा विश्वास आहे. मात्र प्रत्येक पक्षाला आपले संघटन वाढवण्याचा अधिकार आहे. महायुती झाली नाही, तरी आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण आहे. परंतु महायुती व्हावी, हीच आमची भूमिका आहे.”
बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्जतेचा संदेश देत उदय सामंत यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या तत्त्वांवर निवडणूक लढविण्याचा मंत्र दिला.
