निवडणूक कालावधीत सार्वजनिक व खाजगी जागांवर झेंडे-भित्तीपत्रकांना मनाई
- by Yogesh Bandagale
- November 06, 2025
- 104 views
रत्नागिरी (जिमाका): नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही खाजगी व्यक्तींच्या जागेवर किंवा सार्वजनिक जागेवर झेंडे, कापडी फलक, भित्तीपत्रके किंवा घोषणांची लेखनात्मक प्रचार सामग्री परवानगीशिवाय लावण्यास जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी निर्बंध घातले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि स्वच्छ वातावरणात पार पडावी, या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांनी निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही इमारतीची भिंत, आवार, जागा, सार्वजनिक बांधकामे, रस्त्याकडील भिंती, दुकाने किंवा खाजगी घरे यांवर मालकाची लेखी परवानगी तसेच संबंधित प्राधिकरणाकडून परवाना मिळविल्याशिवाय झेंडे, पोस्टर्स, बॅनर्स, फलक इत्यादी लावण्यास सक्त मनाई आहे.
हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 आणि सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा, 1995 अंतर्गत लागू केला असून उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
प्रत्येक व्यक्तीपर्यंत आदेशाची माहिती पोहोचविण्यासाठी पोलीस विभागाने ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीरात करून प्रसारमाध्यमांनी त्यास प्रसिद्धी द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
