नारदखेरकी ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
- by Yogesh Bandagale
- January 07, 2026
- 168 views
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तंटामुक्त व निर्मल ग्रामपंचायत नारदखेरकी यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामपंचायत ही केवळ कार्यालय नसून विकासाचे मंदिर असावे आणि या इमारतीतून सर्वसामान्य ग्रामस्थांची कामे सुलभपणे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात, “ग्रामविकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकासकामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून दिले जाईल,” असा ठाम शब्द दिला.
या उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार सदानंद चव्हाण, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव, संदीप सावंत, नगरसेवक निहार कोवळे, नगरसेवक कपिल शिर्के, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश घाग यांच्यासह सरपंच राघो अंबवकर, उपसरपंच मारुती आंब्रे, विविध शासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने, जीव ओतून काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
नव्या ग्रामपंचायत इमारतीमुळे नारदखेरकी गावाच्या प्रशासनिक कामकाजाला गती मिळणार असून ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
