नांदिवसे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन

आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

चिपळूण (प्रतिनिधी) : गावाच्या सर्वांगीण विकासाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, नांदिवसे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले “ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू आहे. या नूतन इमारतीमुळे गावातील प्रशासन अधिक सक्षम, कार्यक्षम आणि पारदर्शक बनेल. ग्रामस्थांसाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध होतील आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात अधिक वेग येईल,”

ते पुढे म्हणाले,“मी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळत सहा महिन्यांच्या आत ही इमारत पूर्ण झाली याचे समाधान वाटते. 2021 च्या अतिवृष्टीच्या काळात गावातील पूल वाहून गेला होता, तो मजुरांच्या मदतीने पुन्हा उभारून उद्घाटन केले तो क्षण आजही लक्षात आहे. माझ्या आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे केली, त्यामध्ये प्रसिद्ध कालभैरव मंदिराच्या रस्त्याचे काम हे विशेष उल्लेखनीय आहे.”

माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की,“गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या या नव्या इमारतीमुळे नागरिकांना सोयीस्कर सुविधा मिळतील आणि विकासाचा वेग वाढेल.”

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नांदिवसे गावाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम एकतेचा, सहभागाचा आणि विकासाच्या नव्या पर्वाचा प्रतीक ठरला.

या प्रसंगी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अशोकभाई कदम, निहार कोवळे, दिनेश शिंदे, सरपंच सायली शिंदे, उपतालुका प्रमुख संजय गणवे, ज्येष्ठ नागरिक जयवंतराव शिंदे, रमेश शिंदे, भरतराव शिंदे, दयानंद शिंदे, नीता पाड्याळ, नरसिंगराव शिंदे, शशिकांत शिंदे, शंकरराव शिंदे, प्रकाश शिंदे, श्रीकांत शिंदे, सुनील शिंदे, वैदही शिंदे, अशोक कदम, अनिकेत शिंदे, वैशाली मोडक, तसेच सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख