नगराध्यक्ष उमेश सकपाळ य़ांची धडाकेबाज सुरुवात; भाजी मंडई व मटन मार्केटची पाहणी

 

 

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी पदभार स्वीकारताच शहरातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत जोरदार कामाला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी नारायण तलावाची पाहणी केल्यानंतर, गेले अनेक वर्षे रखडलेल्या भाजी मंडई आणि मटन मार्केट या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीवेळी उपमुख्याधिकारी, प्रमुख ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह नगर परिषदेतील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच नगरसेवक कपिल शिर्के, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण हेही या वेळी उपस्थित होते.

 

मटन मार्केटची पाहणी करताना तेथील तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शौचालयातील व मच्छी मार्केटमधील घाण थेट नदीत जात असल्याचा प्रकार गंभीर असून, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यक ती खबरदारी तात्काळ घेण्यात आली नाही, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

त्यानंतर भाजी मंडईची पाहणी करताना नगराध्यक्ष सकपाळ यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. भाजी मंडी व मटन मार्केट या दोन्ही विषयांवर लवकरच योग्य व ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

नगराध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख