देवरूख – श्री गणेश वेदपाठ शाळेचा 28 वा वर्धापन दिन
- by Yogesh Bandagale
- December 03, 2025
- 49 views
मिलिंद देसाई / चिपळूण: देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळेचा 28 वा वर्धापन दिन यावर्षीही धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. 7 ते 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत भाविकांसाठी कीर्तन, व्याख्यान, याग आणि प्रसाद यांची त्रिवेणी लाभणार असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कल्याण येथील प्रसिद्ध कार्पोरेट कीर्तनकार श्री. समीर लिमये यांचे “गुरुसेवा” या विषयावर कीर्तन होणार आहे. भक्तिमय आणि प्रेरणादायी आशयाने परिपूर्ण असे हे कीर्तन उत्सवाची सुरुवात अधिकच मंगलमय करणार आहे.
दुसऱ्या दिवशी, सोमवार 8 डिसेंबर रोजी पुणे येथील प्रतिष्ठित व्याख्यात्या गीता उपासनी यांचे “अध्यात्मवादी सावरकर” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील आध्यात्मिक पैलूंवर प्रकाश टाकणारे हे व्याख्यान श्रोत्यांना नव्या विचारप्रवाहाची ओळख करून देणार आहे.
समारोपाच्या दिवशी, 9 डिसेंबर रोजी पुणे येथील ह.भ.प. रोहिणी माने परांजपे यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कीर्तनाला श्री. केदार लिंगायत तबला साथी तर रत्नागिरीचे श्री. चैतन्य पटवर्धन हार्मोनियमची साथ देणार आहेत. त्यामुळे अंतिम दिवस भक्तिरसाने ओथंबून जाणार आहे.
वर्धापनदिन उत्सवाच्या सर्व दिवसांत सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत श्रीसूक्त याग होणार असून रात्री 8 ते 9 या वेळेत सर्व उपस्थितांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन आहे. संपूर्ण उत्सव भक्ती, ज्ञान आणि संस्कार यांचा संगम साधणारा ठरणार असून संस्थेमार्फत सर्व भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
