देवरूखच्या उपनगराध्यक्षपदी वैभव पवार यांची बिनविरोध
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 66 views
महायुतीचे वर्चस्व; स्वीकृत नगरसेवकपदी रूपेश भागवत व सागर संसारे
देवरूख : देवरूख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) चे वैभव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून महायुतीकडून भाजपाचे रूपेश भागवत, तर राष्ट्रवादी आघाडीकडून मनसेचे शहराध्यक्ष सागर संसारे यांची निवड करण्यात आली.
देवरूख नगर पंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या सभेत उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सत्ताधारी महायुतीकडून शिवसेनेचे वैभव पवार यांनी उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र विरोधी पक्षांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने वैभव पवार यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व राखले आहे. देवरूख नगर पंचायतीच्या थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. मृणाल शेट्ये यांची निवड झाली होती. निवडणुकीनंतर नगर पंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, कार्यालयीन अधीक्षक राणे, तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
या सभेत दोन जागांवरील स्वीकृत नगरसेवकांचीही निवड करण्यात आली. सत्ताधारी महायुतीकडून भाजपाचे रूपेश भागवत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, तर राष्ट्रवादी आघाडीकडून मनसेचे शहराध्यक्ष सागर संसारे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार रूपेश भागवत व सागर संसारे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
नूतन उपनगराध्यक्ष वैभव पवार, स्वीकृत नगरसेवक रूपेश भागवत व सागर संसारे यांचे नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्यासह सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले.
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वैभव पवार यांनी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे व एकसंघ भावनेतून काम करून देवरूख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले.
