देवरुख नं ४ शाळेने हिवाळी क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली
- by Yogesh Bandagale
- December 18, 2025
- 89 views
देवरुख : आजच्या काळात पाश्चात्य शिक्षण पद्धतींचा प्रभाव वाढत असताना मराठी शाळा मागे पडत चालल्या आहेत. मात्र देवरुख येथील श्री श्री छत्रपती राजे शिवाजी महाराज शाळा नं ४ (जिल्हा परिषद) या शाळेने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देवरुख नं १ बिटच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पूर शाळेच्या प्रांगणात पार पडल्या. या स्पर्धेत देवरुख नं ४ शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली.
वैयक्तिक स्पर्धांमध्ये ५० मीटर धावणे (मुली) या स्पर्धेत सानवी सुभाष जाधव हिने प्रथम, तर स्वरा सुभाष जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावला. ५० मीटर धावणे (मुलगे) स्पर्धेत चैतन्य अरविंद बांबाडे याने द्वितीय क्रमांक मिळवला. लांब उडी (मुली) स्पर्धेत वेद रमेश शिंदे हिने द्वितीय क्रमांक, तर उंच उडी (मुली) स्पर्धेत सानवी सुभाष जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवला. उंच उडी (मुलगे) स्पर्धेत वेद रमेश शिंदे याने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना शिक्षक श्री संदेश झेपले, श्री श्रीकांत शिंदे, श्री रमेश शिवगण, सौ दिक्षा महाडिक, श्रीमती समीक्षा पांचाळ व पदवीधर शिक्षक श्री वैभव थरवळ यांचे मार्गदर्शन लाभले.
सांघिक स्पर्धांमध्ये लहानगट मुली कबड्डी स्पर्धेत कु माही कामेरकर, कु शौर्या वाघमोडे व कु सावी इंदुलकर यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. या संघाला सौ समीक्षा पांचाळ, ममता मोरे व पूजा यादव यांचे मार्गदर्शन लाभले. लहानगट मुली लंगडी स्पर्धेत स्वरा जाधव, सानवी जाधव, देविका टाकळे, सानवी टाकळे व पर्णवी वाजे यांनी पाटगाव व मुचरी केंद्रावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या संघाला सौ दिक्षा महाडिक, सौ तृप्ती पंदरे व सौ माधुरी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. लहानगट मुलगे कबड्डी स्पर्धेत सार्थक शिंदे, चैतन्य बांबाडे, नमिश भोंदे व प्रेम मुंडे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. या संघाला श्री रमेश शिवगण, श्री श्रीकांत शिंदे व श्री हर्षवर्धन माने यांचे मार्गदर्शन लाभले. खो-खो स्पर्धेत अब्दुल फुलारी, अहमद बोदले, अर्णव रेवणे, स्पंदन गोंधळी व वीर वनकर यांनी अंबवली व पाटगाव केंद्रावर विजय मिळवत विजेतेपद मिळवले. या संघाला श्री सुनील सावंत व श्री बाळकृष्ण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
मोठा गट मुलगे व मुली कबड्डी स्पर्धेतही शाळेने विजेतेपद मिळवले. या संघातून रुद्राक्ष मुंडे, समर्थ सनगरे व यश कुळये यांनी उत्कृष्ट खेळ केला. मुलींच्या संघातून सोनल शिंदे हिने अष्टपैलू खेळ करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या संघाला श्री संदेश झेपले, पदवीधर शिक्षक श्री वैभव थरवळ व श्री हर्षवर्धन माने यांचे मार्गदर्शन लाभले. मोठा गट १०० मीटर धावणे (मुलगे) स्पर्धेत सिद्धेश कातकर याने प्रथम, लांब उडी स्पर्धेत द्वितीय, तर उंच उडी स्पर्धेत रुद्राक्ष मुंडे याने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना श्री सुधीर जागुष्टे, श्री योगेश शिंदे, श्री कृष्णा मेस्त्री व श्री प्रवीण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व वैयक्तिक व सांघिक विजेते खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी श्री वैभव (बापू) संसारे यांनी दिली असून त्यांनी सर्व खेळाडू, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील तालुका स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
