दापोली एसटी स्थानकात भरधाव बसची धडक; तरुण जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 91 views
दापोली : दापोली एसटी बस स्थानक परिसरात भरधाव व बेजबाबदारपणे बस चालवून एका पादचाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
या अपघातात नवमान नजीर गिलगिले (वय १८, रा. केळशी मदनतरी, ता. दापोली) हा तरुण जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. याप्रकरणी नवमान याने दिलेल्या फिर्यादीवरून एसटी चालक किरण महादेव मोरे (वय ३४, रा. दापोली) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवमान हा आपल्या ताहीद चौस व आफिक अरे या मित्रांसह गावी जाण्यासाठी दापोली एसटी स्थानकात आला होता. यावेळी डेपोमध्ये उभी असलेली एमएच २० बीएल २२७३ क्रमांकाची बस चालकाने मागे घेत असताना निष्काळजीपणा दाखवला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने नवमानच्या पायाला जोराची धडक दिली, ज्यामुळे त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.
गर्दीच्या व वर्दळीच्या ठिकाणी चालकाने दाखवलेल्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दापोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
