दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

दापोली (प्रतिनिधी): पर्यटनासाठी दापोली येथे आलेल्या मुंबई–कल्याण येथील सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील तेरा वर्षीय आंचल मदन सकपाळ हिचा शनिवारी (२७ डिसेंबर) सकाळी अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदासाठी सुरू झालेला सुट्ट्यांचा प्रवास काही तासांतच शोकांत ठरला.


२५ डिसेंबर रोजी सकपाळ कुटुंब दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आले होते. समुद्रकिनारा व निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर शनिवारी सकाळी परतीच्या तयारीदरम्यान आंचल शुद्धीवर नसल्याचे आढळले. तत्काळ तिला स्थानिकांच्या मदतीने आंजर्ले येथील रुग्णालयात, त्यानंतर दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.


आंचल ही कल्याण येथील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. कोणतीही तक्रार नसताना रात्री झोपलेली मुलगी सकाळी उठली नाही, ही बाब कुटुंबीयांसाठी अधिक वेदनादायक ठरली आहे. एकुलती एक मुलगी अचानक हिरावून गेल्याने कुटुंबीय व नातेवाईक शोकाकुल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, नगरपंचायतचे अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर व सहाय्यक निरीक्षक यादव यांनीही रुग्णालयात भेट देत घटनेची माहिती घेतली.


आंचलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार अन्नातून विषबाधेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख