दापोलीत कोट्यावधींच्या व्हेल माशाच्या उलटीसह ४ जण अटक, पोलीस कर्मचारीही समावेश

दापोली: दापोली येथे सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने दापोली बस स्थानकाजवळ एका कारमधून कोट्यावधी रुपये किंमतीची चार किलो आठशे त्रेचाळीस ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दि. १७ रोजी व्हेल माशाची उलटी विक्री करण्याचा प्रयत्न होईल अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून ते दापोली बस स्थानकाजवळ थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात व्हेल माशाची उलटी आढळली. या कारमध्ये चार संशयित आढळून आले, त्यांना ताब्यात घेऊन दापोली येथील कस्टम्स कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. संशयितांचे नाव पुढीलप्रमाणे आहे: युवराज मोरे (मुंबई), संजय धोपट (दाभोळ) जो दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, निलेश साळवी (रत्नागिरी) आणि सिराज शेख (मुंबई). यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोतदार, निरीक्षक प्रतीक अहलावत, रमणिक सिंग, मुख्य हवालदार सुहास वेलणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौऱ्या आणि हेमंत वासनिक यांनी केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित लेख